जिल्हा परिषद कॉलनीत धाडसी घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील जिल्हा परिषद कॉलनीधील रहिवाशी गोपाळ बाळकृष्ण भुसारी यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना 6 डिसें.रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार शनिवारी सकाळी कमलाबाई भुसारी (80) यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना अवगत केले.
घराचे काम सुरु असल्यामुळे वृद्ध महिला कमलाबाई भुसारी ह्या शेजारच्या लहान मुलाकडे (माणिक भुसारी) रात्री थांबल्या होत्या, हिच बाब हेरून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने असलेल्या दारातून दार तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले. तसेच चोरट्यांनी पळ काढण्या अगोदर किचन मध्ये चहा बनवून घेतल्याचेही निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी वृद्ध आईचे सुटकेंस मध्ये ठेवलेले 9 तोळ्याची दागिणे व 45 हजार रुपये लांबविले. व काही इतर साहित्य घरात फेकून दिल्याचे दिसून आले. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात आली.  

एक्सपर्ट केली पाहणी 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ येथून डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी भुसारी यांच्या घराची बारकाईने पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.

नगरपरिषदेनी घेतली दखल, शेवट डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लोकांसाठी खुले करणार!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील नगरपालीका हद्दीतील मध्यवस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जे बंद अवस्थेत व दुर्लक्षीत आहे ते पूर्ववत सुरु करण्यासाठी नगरपालिकेनी निवेदनाची दखल घेत 6 डिसेंबर ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व. वाचनालय मध्ये महापरीनिर्वाण अभिवादन करण्यात आले, यावेळी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार संजय देरकर व त्याच्या प्रमुख उपस्थितीत कृती आराखडा प्रत देण्यात आली. यावेळी संजय निखाडे, शरद ठाकरे, माजी नगराध्यक्षा सुरेश रायपूरे, करुणा कांबळे, माजी नगरसेवक राजु तुरणकर, गुलाब आवारी, अनिल पिंपलकर, अशोक ठाकुरवार व सहकारी उपस्थित होते.



कृती आराखडा सुद्धा तयार करून काम सुरु करणार असे लेखी दिले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पूर्ववत करण्यात येणार सोबत रंगरंगोटी व साफसफाई करण्यात यावी व कायमस्वरुपी त्या वाचनालयाला पूर्ववत लोकांसाठी खुले करण्यात यावे. या वाचनालयाची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात येणार. 

यावेळी बबलुभाऊ मेश्राम, प्रविण खान‌झोडे, धीरज पाते, रवींद्र कांबळे, किशोर मुन, पी के टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम,  शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सूरज उपरे, दादाजी देठे, सर्व सहकारी उपस्थित होते व सर्वांनी सहकार्य केले, यावेळी विधायक कामात ज्यांनी सहकार्य त्याचे आभार रवींद्र मेश्राम यांनी मानले.

गावातील मोकाट श्वान व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुकूटबन : गावातील मोकाट श्वानांचा (कुञ्यांचा) व डुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणीचे निवेदन ग्राम पंचायत ला शुक्रवारी (ता. 6) रोजी देण्यात आले.

गेल्या काही दिवसापासुन गावामध्ये मोकाट श्वानांचा (कुञ्यांचा) वावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच डुकरांचा सुद्धा वावर वाढत चालला आहे. याचा गावातील नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत असुन काही श्वानांमुळे (कुञ्यांमुळे) रस्त्याने चालताना नागरिकांना भिती बाळगावी लागत आहे. तसेच काही ठिकाणी लहान मुलांना तसेच शाळेकरी विद्यार्थी यांना देखील ये जा करताना मनात धासगी भरत आहे. घराबाहेर पडताना सुद्धा ही भिती मनात बाळगुन बाहेर पडावे लागत आहे. 

गेल्या काही दिवसापासुन यामधील काही श्वान (कुञे) हे पिसाळलेले असल्यामुळे नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण आढळताना दिसुन येत आहे. गावातील काही परिसरात डुकरांचा सुद्धा वावर वाढला आहे व याचा देखील ञास होत आहे. यामुळे मोकाट श्वानांचा (कुञ्यांचा) व डुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी प्रियाल पथाडे, कुणाल नागभिडकर व सचिन मुळे यांनी निवेदनातुन ग्राम पंचायत कडे केली.

महसूल पथकाने विनापरवाना रेतीची तीन ट्रॅक्टर पकडले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला कुठंतरी आळा बसावा यासाठी तहसीलदार उत्तम निलावड यांची धडक मोहीम सतत सुरु असताना देखील रेतीची अवैध वाहतूक थांबलेली दिसत नाही, आज शुक्रवारी (ता. 6) ला सकाळी 7 वा. रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले.

तालुक्यातील उपाशा नाल्यातून ते कोसरा अशी रेतीची विनापरवाना अवैध वाहतूक करणारे तिन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात दंडात्मक कारवाईकरिता जमा केले आहे. सदरची धडक मोहीम तहसीलदार उत्तम निलावड यांच्या मार्गदर्शनात तलाठी सोयाम, कुडमेथे, सरनाईक यांनी फतेह केली. 

सदर कारवाईने मारेगाव तालुक्यात रेती तस्करी छुप्या मार्गाने होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

पुन्हा जीव ओतून काम करणार - राजू उंबरकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवमुद्रा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. प्रश्नउत्तराला समोर जाताना उंबरकर यांनी जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र,"जर असे झाले नसते तर येत्या काळात मतदारसंघाचा कायापालट आणि विकासात्मक बाबीने चित्र वेगळे असते". असा आशावाद मनसे चे पक्षनेते राजु उंबरकर यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. 

विजयी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना शुभेच्छा दिल्या, चांगल्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत राहील. एक दोन दिवसात त्यांची भेट घेऊ असेही ते म्हणाले. 

पुढं म्हणाले की,मी पुन्हा जीव ओतून काम करणार आहे, माझ्या माता भगिनींसाठी ठाम आहेत. तसेंच रुग्णसेवा कायम सुरु राहिल, रोजगारासाठी लढा सुरु राहिल. येथील प्रत्येक जन माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. म्हणून गेली २० वर्ष मी येथील माता – भगिनी, युवक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सर्वसामान्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत आलो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वबळावर लढू, लढणार नाही तर जिंकून येऊ, कारण मी रडणारा नाही तर लढणारा माणूस आहे, असे त्यांनी परिषदेत सांगितले. 

निवडणूकीत पैशाचा महापूर 
राजू उंबरकर यांनी नुकतेच पार पडलेल्या निवडणूकीवर घणाघाती आरोप करत पैशाचा महापूर झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे बोलताना म्हणाले की, आतातर राज्य त्यांचं आलं, झंडीमुंडी, कोंबड बाजार, मटका सुगंधित तंबाखू तस्करी, गल्लीबोळात फोफावणार. विविध माध्यमातून जनतेची लूट सुरू असल्याचे उंबरकर यांनी म्हटले आहे. 
मतदारांचे आभार...हा मतदारसंघ माझा परिवार आहे
सर्व मतदारांचे आभार, या निवडणुकीत माझा झालेला पराभव हा मला संपविणारा नाही. कारण आजवरच्या माझ्या इतिहासात अनेकदा मला पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व पराभवानंतर मी कधी खचलो नाही. रणांगण सोडून कधी दूर गेलो नाही. उलट पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो. कारण हा मतदारसंघ माझा परिवार आहे,असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला मनसेचे मा. आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, महिला सेना जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख, शुभम भोयर, संदिप वाघमारे, संतोष चिटलवार, सुमीत टुंड्रावार, मिथुन धोटे, वैभव पुराणकर, सूरज काकडे, धीरज बगवा यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.