आज पोलीस स्टेशन वणी येथील एकुण 34 वाहनांचा लिलाव

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पोलीस स्टेशन वणी येथील एकुण 34 मोटार वाहनांचा न्यायालयाचा आदेशाने निकाल लागलेल्या विविध गुन्हयातील वाहनाचा लिलाव करण्याची प्रक्रीया आज शनिवार दिनांक 12/04/2025 रोजी 11.00 वाजता पासुन पोलीस स्टेशन, वणी येथे लिलाव करण्यात येत आहे.

दिनांक 12/04/2025 पुर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन, वणी येथे वाहनाचे मुळ कागदोपत्री/दस्तऐवजासह हजर राहण्याचं सर्व नागरीकांना आव्हान करण्यात आले आहे.जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास तर 34 वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. त्यानंतर कोणतेही आक्षेप किंवा हरकत नोंद घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे पोलीस स्टेशन वणी कार्यालयातून प्रसिद्धीस कळविण्यात आले आहे.

वणीत सार्वजनिक ठिकाणी झंडीमुंडी जुगार अड्ड्यावर छापा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पोलिसांनी गुरुवारी दुपारी दीपक चौपाटी परिसरातील एका बार समोर सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या झंडी मुंडी जुगार अड्ड्यावर छापा घालून पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून झंडी मुंडी फ्लेक्स बोर्ड व चार गोटया असा एकूण 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर गणपत धंदरे (वय 58) रा. रामपुरा वार्ड वणी, परवेज सय्यद सय्यद तनवीर (वय 22) रा. रंगनाथनगर, अरूण गंगाधर पामपट्टीवार (वय 59) रा. गणेशपुर, हुसेन वामन आत्राम (वय 30) रा. ढाकरी ता.वणी, कवडु गणपत कांबळे (वय 83) रा. लालगुडा, अशी मिळालेल्या आरोपीची नावे आहेत.

करण बार समोरील परिसरात झंडी मुंडी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने गुरुवारी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास सदर ठिकाणी छापा घातला असता वरील पाच जनांना पकडले. त्यांचे कडून पाच हजार रुपयांची साहित्य जप्त केले.त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उंबरकर यांचे आदेशानुसार पोउपनि. गुल्हाने, पोउपनि. रत्नपारखी, व पोलीस स्टेशन वणी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आत्महत्येची धग... 'त्या' शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज संपली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथे शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दि.3 एप्रिल रोजी घडली होती. या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी दि.9 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. 

बाबाराव जनार्दन गौरकार (वय 58) रा. ईजासन (गोडगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील ईजासन शेत शिवारात मागील गुरुवारी  त्याने सायंकाळी 6 वाजता विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर प्रथमता वणी रुग्णालय येथे प्रथमोपचार करून त्यांना येथीलच एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांचे वर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान बुधवार दि.9 एप्रिल रोजी मृत्यू झाला. घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजते आहे.

मृतकाचे पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक विवाहित मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

5 दिवस 'आपले सरकार'ची सेवा राहणार बंद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा 'आपले सरकार' पोर्टल वरून प्रदान केल्या जातात. मात्र, तांत्रिक कामामुळे 5 दिवसांसाठी "आपले सरकार" या पोर्टलचे कामकाज बंद राहणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. 

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी दिनांक 10 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहणार आहे. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे तहसीलदार उत्तम निलावाड, मारेगाव यांनी सांगितले.

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची कारवाई


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी उपविभागीय क्षेत्रात वाळूची‎ अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाईचा बळगा उगारल्याचे दिसून येत आहे. अशातच काल सकाळी वणीचे नायब तहसीलदार‎ ब्राम्हवाडे यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर‎ पकडले. 

यावेळी ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास अवैध‎ वाळू मिळून आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी‎ पंचनामा करून ट्रॅक्टर वणी तहसील कार्यालयात जमा केला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास करण्यात‎ आली आहे. या कारवाईमुळे वाळूची तस्करी‎ करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.‎ वणीचे नायब तहसीलदार अशोक ब्राम्हवाडे यांच्यासह तलाठी विरुटकर उमरी फाट्यावर 8 एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ‎ वाजेच्या सुमारास पाळत ठेवून होते.

यावेळी‎ त्यांना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे‎ विना क्रमांकाचा‎ ट्रॅक्ट्रर ट्रॉली मधून अंदाजे एक ब्रास अवैध वाळूची‎ वाहतूक करतांना आढळले. त्यानंतर कायर मार्गे उमरी कडे येणाऱ्या ट्रॅक्टर सह ट्रॉली ची महसूल पथकाने‎ विचारपूस केली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही कारवाई केली आहे. वणी तालुक्यातील‎ नदी-नाल्याच्या पात्रातून वाळूचे उत्खनन‎ करुन व महसूल पथकावर वाळू तस्कर‎ पाळत ठेऊन त्यांचे लोकेशन घेत अवैध‎ वाळूची वाहतुक करत आहेत. 

तहसीलदार‎ निखील धुळधर यांच्या मार्गदर्शनात‎ पथक तयार करण्यात आले हे पथक गस्त‎ घालत असताना उपरोक्त ट्रॅक्टर मधून अवैध‎ वाळूची वाहतुक करताना उमरी येथे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नायब‎ तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, तलाठी विरुटकर, यांनी केली आहेे.‎