5 दिवस 'आपले सरकार'ची सेवा राहणार बंद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा 'आपले सरकार' पोर्टल वरून प्रदान केल्या जातात. मात्र, तांत्रिक कामामुळे 5 दिवसांसाठी "आपले सरकार" या पोर्टलचे कामकाज बंद राहणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. 

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी दिनांक 10 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहणार आहे. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे तहसीलदार उत्तम निलावाड, मारेगाव यांनी सांगितले.