सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आज वणीत सर्वात बिकट प्रश्न पाणी समस्येचा आहे. दर चार दिवसांनी शहरात पाणी पुरवठा होते. त्यातच मध्यरात्री माता भगिणींना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. अनेकदा मध्यरात्री जागे राहूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नगराध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम वणीकरांचा पाणी प्रश्न सोडवणार, अशी गर्जना शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे यांनी केली. त्या प्रभाग क्रमांक 2 व 8 च्या कॉर्नर सभेत बोलत होत्या.
डॉ. संचिता विजय नगराळे यांच्या कॉर्नर सभा व रॅलीला मतदारांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. उच्चशिक्षित उमेदवार व सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण असलेल्या उमेदवार म्हणून मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. शुक्रवारी रात्री गुरुनगर येथे प्रभाग 2 चे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योत्स्ना बालाजी धोटे, राजू किसन तुराणकर प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार सुधीर रिमदेव थेरे व काँग्रेस उमेदवार सारिका पवन सिद्धमशेट्टीवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपने विकासाचा फुगा फुगवला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम योग्य प्रकारे झाले नाही. विकास नाही तर भ्रष्टाचार हाच भाजपचा विकास आहे. अशी टिका त्यांनी केली. अध्यक्षीय भाषणात आमदार संजय देरकर रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही. भाजपने केलेले कार्य हे निकृष्ट दर्जाचे आहे. अवघ्या एक वर्षात रस्ते उखडत आहे. भाजपने करवाढ वणीकरांच्या डोक्यावर बसवली. आता त्यांना खाली बसवण्याची वेळ आली आहे, अशी टिका केली.
सभेच्या सुरुवातीला उमेदवार राजू तुराणकर यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी याआधीही एका फोनवर नागरिकांच्या प्रश्नांसाठी धावून गेलो आहे. यापुढे ही त्याच आस्थेने काम करणार असे वचन मतदारांना दिले. सुधीर थेरे यांनी स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. यावेळी डॉ. महेंद्र लोढा, आशिष खुलसंगे, सुनिल कातकडे यांनी भाजपच्या कार्यावर जोरदार प्रहार केला.
यावेळी संजय निखाडे, सुनिल कातकडे, डॉ. महेंद्र लोढा, आशिष खुलसंगे, राजू उंबरकर, दिपक कोकास, गणपत लेडांगे, फाल्गुन गोहोकार, प्रकाश मॅकलवार, अजिंक्य शेंडे इत्यादी शिवसेना (उबाठा), काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेला असंख्य लोक उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतानी निवडून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



