सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : सतत वाढणारी वाहतूक कोंडी, अवैध प्रवासी वाहतूक, बेफाम वाहनचालक आणि नियमभंगामुळे मारेगाव शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून परिस्थिती गंभीर बनली आहे. याबाबत नागरिक विलास गोविंदराव रायपुरे आणि गजानन सुधाकर चंदनखेडे यांनी प्रशासनाकडे निवेदन देत कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मारेगाव हा शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका असूनसुद्धा शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे संबंधित विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. पादचारी आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वाहतुकीची शिस्त मोडीत निघाल्याने किरकोळ अपघातांसह गंभीर अपघातांची मालिका सुरू आहे.
• राज्य महामार्गावर धोकादायक वाहतूक
रेती, मुरूम, कोळसा, गिट्टी वाहतूक करणारे हायवा, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो रिफ्लेक्टर नसतानाही बेदम वेगाने धावत असून राज्य महामार्गावर अपघातांची शक्यता वाढली आहे. ग्रामीण भागासह शहरात सर्वाधिक जिवीतहानी होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
• वाढती वाहनसंख्या,रस्ते ओलांडणे "महाभारत"
शाळकरी मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना रस्ते ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील दुचाकी चालकांकडून सुसाट वेगाने वाहन चालवणे,हेल्मेटचा अभाव,
दारू पिऊन वाहनचालक,ओव्हरटेकचे धाडसे, अल्पवयीन मुलांकडून वाहनचालक, बदललेल्या सायलेंसरचा प्रचंड आवाज हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
• अवैध प्रवासी वाहतूक ठिकठिकाणी
क्षमता ओलांडून प्रवासी बसवणे, शाळकरी मुलांना भरगच्च वाहनात ने-आण करणे, गर्दीच्या चौकात बेशिस्तपणे थांबणे यामुळे वाहतुकीची शिस्त ढासळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शाळा परिसर आणि सरकारी कार्यालयांजवळ कोंडी हा नित्याचा भाग बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
• जुन्या वाहनांची रेलचेल: ‘अच्छे दिन’ व्यंगचित्रासारखे वास्तव
कालबाह्य जुन्या वाहनांची शहरात बेधडक धावपळ असून नियमनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. शहरातील फुटपाथ पूर्णपणे अतिक्रमित झाल्याने पादचारी रस्त्यावर उतरल्यामुळे दुर्घटनांची शक्यता अधिक वाढली आहे.
• कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी
कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमावा, बेलगाम वाहतुकीवर विशेष शोधमोहीम राबवावी,कठोर अंमलबजावणी करावी,
पादचाऱ्यांवरील ताण कमी करावा, अशी ठाम मागणी निवेदनातून देण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वाहतूक शिस्त प्रस्थापित न केल्यास गंभीर परिणामांची शक्यता वर्तवली आहे.