सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
वणी : शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून कायद्याच्या अंमलबजावणीपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका सराफा व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून सुमारे १२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची गंभीर घटना घडली होती. त्यातच दुचाकी चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांनीही नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘अमोल टी अँड पान कॉर्नर’ या प्रसिद्ध पानटपरीची अज्ञात चोरट्यांनी चोरी करून फोडफाड केली. तब्बल १५ ते २० हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली असून, अद्याप तक्रार दाखल झालेली नसल्याचे दुकान मालक अमोल रमेश मडावी यांनी माध्यमातून सांगितले.
विशेष म्हणजे, हा चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि रात्रभर सतत वाहतूक सुरू असणारा परिसर आहे. अशा ठिकाणी निर्भयपणे पानटपरी फोडून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
आता पोलिसांनी या अज्ञात आरोपींचा शोध कितपत गतीने घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.