टॉप बातम्या

वणी-घुग्गुस मार्गावर भीषण अपघात – कार शिकविताना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी-घुग्गुस मार्गावर शुक्रवारी (31 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास झालेल्या भयंकर अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जन्नत सिलिब्रेशन हॉलपासून काही अंतरावर ट्रक आणि कार यांचा हा भीषण अपघात घडला. मुलीला कार चालवायला शिकवित असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लालपुलिया परिसरातील रहिवासी आणि ट्रॅक दुरुस्तीचे काम करणारे रियाज शेख हे आपल्या मुलीला कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी घुग्गुस मार्गावर गेले होते. मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट दुभाजकावरून उसळून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात कारमधील तीन मुली जागीच ठार झाल्या, तर गंभीर जखमी झालेले रियाज शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात रियाज शेख यांच्या भावाची मुलगी गंभीर जखमी असून तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलीला कार शिकवित असताना काळाने घेतलेला हा घाला सर्वांना चटका लावणारा ठरला आहे. ही प्राथमिक माहिती असून, पोलिसांकडून अधिक तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();