सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय कार्यालय, वणी यांच्या वतीने शासकीय मैदान, वणी येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने Target Disaster Response Force (TDRF) मधील मुख्य क्षेत्रीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मुस्कान परविन जलील सैय्यद यांना सन 2025–26 मधील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्यासाठी उपविभागीय अधिकारी मा. नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते व तहसीलदार वणी मा. निखिल धूळधर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मंचावर वणीचे आमदार संजय देरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, माजी आमदार बोदकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. TDRF संचालक श्री. हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी या पदावर कार्य करत असताना मुस्कान सैय्यद यांनी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे.
SCERT, पुणे येथे युनीसेफ व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य निर्मिती कार्यशाळेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वाचन साहित्यात त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वृक्षारोपण करून त्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी त्या स्वतः घेतात. हरितक्रांती दिनानिमित्त २०० हून अधिक वृक्ष लागवड व वाटप, तसेच ‘हर घर तिरंगा’ राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
कोविड-१९ महामारीच्या काळात वणी तहसील प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना यापूर्वीही प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा व वणी तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांत आपत्ती व्यवस्थापन, देशभक्तीविषयक जनजागृती, आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे आदी सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सक्रिय सहभाग घेत असून, इतरांनाही सामाजिक व राष्ट्रकार्य करण्यासाठी प्रेरित करीत आहेत.
या सन्मानाचे श्रेय TDRF संचालक श्री. हरिश्चंद्र राठोड, सहाय्यक संचालिका श्रीमती रुपाली राठोड, संपूर्ण TDRF परिवार तसेच सैय्यद परिवार यांना देत असल्याचे मुस्कान सैय्यद यांनी यावेळी सांगितले.