टॉप बातम्या

मार्डी परिसरात वाघाची दहशत: शेतात पाणी देताना वाघ समोर; शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील मार्डी परिसरातील गोऱज भागात २९ डिसेंबर रोजी शेतात पाणी देत असताना एका शेतकऱ्याला अवघ्या १०० फूट अंतरावर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आज (१ जाने. २०२६) ला सुद्धा शिवणी परिसरातील शेतशिवारातही वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा गावात ऐकू येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारेगाव तालुक्यातील हिवरा येथील रहिवासी तसेच शिवसेना (उबाठा गट) चे नेते पुरुषोत्तम बुटे यांची गोऱज परिसरात शेती आहे. नेहमीप्रमाणे ते हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असताना अचानक समोर पट्टेरी वाघ दिसून आला. हा वाघ लंगडत चालत असून थेट बुटे यांच्या दिशेने येत होता. वाघ अवघ्या १०० फूटांवर आल्याने शेतकरी प्रचंड घाबरले.
मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी तत्काळ शेतातील शेडमध्ये धाव घेऊन दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

याआधीही मार्डी परिसरातील दांडगाव, गोऱज व आपटी भागात वाघाचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या असून, त्या वेळी वाघासोबत बछडे असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. आज शिवणी परिसरातील शेतशिवारात वाघ दिसल्याची चर्चा असल्याने वाघाचा मुक्त संचार वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“नुसत्या नशिबामुळेच जीव वाचला” – पुरुषोत्तम बुटे
“शेतात पाणी देत असताना अचानक समोर पट्टेरी वाघ दिसला. वाघ लंगडत माझ्या दिशेने येत असल्याने भीतीने माझी धांदल उडाली. तात्काळ शेडमध्ये जाऊन दरवाजा बंद केला. वाघ लंगडत होता, यावरून कुठेतरी शेतात वीजेचा धक्का बसला असावा, असा अंदाज आहे. नुसत्या नशिबामुळेच माझा जीव वाचला,” अशी प्रतिक्रिया शेतकरी पुरुषोत्तम बुटे यांनी दिली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();