सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील लोकप्रिय आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या आकस्मिक निधनाने वणी शहरात शोककळा पसरली आहे. काँग्रेस नेते तसेच अनेक सामाजिक संघटनांशी जोडलेले आणि नेहमीच लोकहितासाठी तत्पर राहिलेले पाथ्रडकर हे शहरातील एक जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
मागील नऊ दिवसांपासून ते जैताई मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या सेवेत कार्यरत होते. समाजसेवेच्या ध्यासाने ते दिवसरात्र कार्यरत असताना अचानक त्यांना अस्वस्थता जाणवली. तातडीने त्यांना वणीतील सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. समाजसेवेसाठी नेहमीच पुढे असणारा एक आधारवड हरपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोकसंवेदना व्यक्त करत पाथ्रडकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"सह्याद्री चौफेर" तर्फे स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.