सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
झरीजामणी : तालुक्यातील पैनगंगा नदीवरील हिरापूर–मांगली रेती घाटावर मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैध रेती उपशाचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत नदीपात्रात सुरू असलेले अवैध उत्खनन रोखण्यात आले. या कारवाईदरम्यान एक पोकलेन मशीन, एक जेसीबी व दोन टिप्पर ट्रक जप्त करण्यात आले असून ही धाड गुरुवार, १२ मार्च रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास टाकण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरापूर–मांगली रेती घाटावर रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना काही दिवसांपासून मिळत होती. माहितीची खात्री करून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पांढरकवडा उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री अचानक कारवाई करत घाटावर सर्जिकल स्ट्राईक केली.
या मोहिमेत एलसीबीचे अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच मुकुटबन पोलीस ठाण्याचा स्टाफ सहभागी झाला होता. पोलिसांचे पथक घाटावर पोहोचताच मशीन ऑपरेटर व ट्रक चालकांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी नदीपात्रातील उत्खनन तात्काळ थांबवत पोकलेन, जेसीबी आणि दोन टिप्पर ट्रक ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या धाडीमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.