सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
झरी : शासकीय आश्रम शाळा माथार्जुन येथे आदिवासी क्रांतिसूर्य वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनोगत व भाषणांनी झाली. विद्यार्थ्यांनी बाबुराव शेडमाके यांच्या शौर्यगाथा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि समाजासाठी केलेल्या कार्याचे प्रभावी वर्णन करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा. योगेश मडावी, सरपंच मा. रवि कायतवार, एस.एम.सी. अध्यक्ष श्री. भीमरावजी मडावी, मुख्याध्यापक श्री. अविनाश मोरे तसेच प्राथमिक शिक्षक श्री. स्वप्नील आत्राम यांनी मार्गदर्शन करताना वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतिकारी कार्याचा व प्रेरणादायी जीवनप्रवासाचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन माध्यमिक शिक्षिका कु. नाझ मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आदिवासी क्रांतिसूर्य वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना अभिवादन केले.