सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथे एका शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रफुल बंडू आत्राम (वय अंदाजे ४१) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास प्रफुल आत्राम यांनी घरातील स्वयंपाकघरात टिनच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. वडिलांच्या नावावर असलेल्या शेतीत ते काम करीत होते. शेतीतील उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील यांनी संबंधित पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी मार्डी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतकाच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके व पोलीस शिपाई सागर दिपेवार करीत आहेत.