टॉप बातम्या

महिला शक्तीचा जागर! मार्डी येथे महिलांनी बदलला ‘मोक्षधाम’चा चेहरामोहरा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मार्डी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मौजा मार्डी येथील महिलांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ‘एक पाऊल प्रगतीकडे’ या संकल्पनेतून गावातील महिलांनी एकत्र येत स्थानिक स्मशानभूमी अर्थात ‘मोक्षधाम’ परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसराचा कायापालट केला. रुढी-परंपरांना छेद देत महिलांनी स्मशानभूमीत श्रमदान करून समाजाला सकारात्मक संदेश दिला.

मोक्षधाम परिसरात वाढलेली रानटी झुडपे, साचलेला कचरा आणि अस्वच्छता महिलांनी श्रमदानातून दूर केली. त्यानंतर परिसरात विविध सावलीच्या व फळझाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला. “स्वच्छ गाव – सुंदर गाव” या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम असून ग्रामस्थांकडून या कार्याचे कौतुक होत आहे.

या उपक्रमावेळी सरपंच रविराज परसराम चंदनखडे, उपसरपंच शोभाताई कालर तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेश पुरुषोत्तम चांगले, छाया पुसारे, मंगला मोहन टिपले, मनिषा संतोष चौधरी आणि बेबीताई ना. मोहले उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या, ‘उमेद’ अभियानातील महिला तसेच ग्रामपंचायत मार्डी येथील महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोक्षधाम परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();