सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मार्डी व नवरगाव ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होताच दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले, तर २९ एप्रिल रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात आला.
मार्डी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक ३ मधील जागा ही माजी सदस्य सुधाकर डाहुले यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या लढतीत मनीषाताई प्रशांत नागपुरे यांनी प्रभावी कामगिरी करत माधुरीताई अंकुश गुरुनुले यांचा पराभव केला. नागपुरे यांना एकूण २२३ मते मिळाली, तर गुरुनुले यांना १८७ मतांवर समाधान मानावे लागले. तसेच ‘नोटा’ला ७ मते मिळाली.
दरम्यान, नवरगाव ग्रामपंचायतीतही दोन प्रभागांमध्ये निवडणूक झाली. प्रभाग क्रमांक १ मध्ये हर्षल शंकर शेंडे यांनी १०० मते मिळवत सुरेश नथूजी डवरे (५९ मते) यांना पराभूत केले. ‘नोटा’ला ६ मते पडली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये संकेत गणेश डवरे यांनी १५६ मते मिळवत प्रतिस्पर्धी सुरेश डवरे (४० मते) यांचा एकतर्फी पराभव केला. येथेही ‘नोटा’ला ६ मते मिळाली.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. या निकालामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चर्चा रंगू लागली आहे.