सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वीज वितरण कंपनीशी संबंधित विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी मारेगाव येथे आज, १७ सप्टेंबर रोजी विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जनता दरबार होणार असून, वीज समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेण्यात येणार आहेत.
दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या घोन्सा रोड, मारेगाव येथील कार्यालयात हा जनता दरबार पार पडणार आहे. शेतीपंपांचा वीजपुरवठा, नवीन वीज जोडणी, वाढीव वीजबिल, वीजपुरवठ्यातील अडथळे तसेच इतर वीजविषयक प्रश्न नागरिकांना यावेळी मांडता येणार आहेत.
नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर थेट मांडून त्यावर तातडीने कार्यवाही व शक्य त्या प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, वीज ग्राहक आणि नागरिकांनी आपापल्या तक्रारी व आवश्यक कागदपत्रांसह जनता दरबारास उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) मारेगाव तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे व तालुका सचिव दिवाकर सातपुते यांनी केले आहे.