टॉप बातम्या

जमीन व्यवहारातील कथित गैरप्रकार चव्हाट्यावर; महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेच्या चौकशीची सुरज चाटेंची मागणी

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : वडगाव (धं.) येथील बनावट सातबारा, बोगस फेरफार आणि कथित खोट्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी तथा संबंधितांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी सुरज चाटे यांनी माजी मंत्री, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
     

बनावट विक्रीपत्राच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर सातबारा उताऱ्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्ती तसेच संबंधित शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती ही शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा, खर्चाचा आणि विकासकामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणारी महत्त्वाची समिती आहे. सध्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे आहे. दि. ११ सप्टेंबर २०२६ मध्ये समितीने वणी तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची व विकास कामांची पाहणी केली.
     
त्यामुळे वडगाव (धं.) येथील महसूल अभिलेखातील कथित गैरप्रकारा बाबतही समितीच्या अध्यक्षांकडे करण्यात आलेल्या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महसूल अभिलेखांमध्ये फेरफार करून नागरिकांच्या जमीन हक्कावर परिणाम करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात संबंधित कागदपत्रांची सत्यता, फेरफार प्रक्रियेतील अधिकाऱ्यांची भूमिका, विक्रीपत्राची वैधता तसेच सातबारा अभिलेखात करण्यात आलेल्या नोंदींची कायदेशीरता यांची स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई न करता, सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर आता संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि विधिमंडळ स्तरावर काय भूमिका घेतली जाते, याकडे वणी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();