टॉप बातम्या

वणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिरसात रंगला जल्लोष

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने वणी शहरात भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण वणी शहर अक्षरशः कृष्णमय झाले. ढोल-ताशांचा कडकडाट, धुमाळ बँडचे सूर, रोषणाई आणि ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

सायंकाळी ६ वाजता अमृत भवन येथून शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. शोभायात्रा जसजशी शहरातील प्रमुख मार्गांवरून पुढे सरकत होती, तसतसा भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पुष्पवृष्टी, जयघोष आणि उत्स्फूर्त स्वागत करत या भक्तिमय सोहळ्याला दाद दिली.

शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते भगवान शंकर-पार्वती, वीर बजरंगबली यांच्यासह विविध देवी-देवतांचे साकारलेले जिवंत देखावे. या देखाव्यांनी बालगोपालांसह नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच अघोरी तांडव, गोंडी ढेमसा नृत्य, असुरांची झाकी आणि गोरिला यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणांनी शोभायात्रेत रंगत आणखी वाढवली.

दरम्यान, वारकरी आणि पदावली भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. भक्तिसंगीत, ढोल-ताशांचा निनाद आणि कृष्णनामाचा जयघोष यामुळे वणीच्या रस्त्यांवर जणू भक्तीचा महासागरच उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या शोभायात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपालांसह हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे शोभायात्रेला भव्य आणि विराट स्वरूप प्राप्त झाले. भाविकांच्या सेवेसाठी उत्सव समितीच्या वतीने फराळ व थंडपेयाचे वाटप करण्यात आले.

या संपूर्ण भव्य सोहळ्याचे आयोजन मार्गदर्शक विजयबाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे जन्माष्टमीचा हा सोहळा वणीकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.

भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या या शोभायात्रेने वणी शहराला केवळ कृष्णभक्तीच्या रंगात रंगवले नाही, तर सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचेही सुंदर दर्शन घडविले.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();