टॉप बातम्या

कुंभा प्रकरणाला नवे वळण; दोन युवक पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

मारेगाव : तालुक्यातील कुंभा येथील सहा वर्षीय चेतन मनोज चांदेकर या बालकाचा मृतदेह गदाजीबोरी शिवारातील नाल्यात आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच कुंभा आणि गदाजीबोरी येथील दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबतची उत्सुकता वाढली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन हा मागील बुधवारी अचानक बेपत्ता झाला होता. बालकाचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथक, संयुक्त के-९ पथक आणि ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली. शोधमोहीम सुरू असतानाच कुंभा येथून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गदाजीबोरी शिवारातील नाल्यात चेतनचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बालकाचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणातील संशयास्पद बाबींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. याच अनुषंगाने दोन युवकांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. मात्र, चेतनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या घटनेत कोणाचा सहभाग आहे का आणि त्यामागे अन्य काही कारण आहे का, या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

एका निरागस बालकाच्या मृत्यूमुळे कुंभा परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके सत्य समोर येणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील गूढ उकलते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();