टॉप बातम्या

वणीत जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या मुजोर एस. बी. लॉनवर कारवाई करा!; अन्यथा मनसेचा आक्रमक आंदोलनाचा इशारा!


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहराच्या मध्यवर्ती भागात आणि शाळा-महाविद्यालयांच्या अगदी जवळ असलेल्या 'एस. बी. हॉल व लॉन' चालकाने सार्वजनिक रस्ता बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे, प्रचंड आवाजात डी.जे. वाजवणे, रस्त्यावरच वाहनांची पार्किंग करणे आणि वॉटर फिल्टरचे दूषित पाणी सोडून नगरपरिषदेच्या लाखो रुपयांच्या रस्त्याची नासधूस करणे, असे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, ८ दिवसांच्या आत हॉलवर कायदेशीर कारवाई करून बंदी घालण्याची मागणी केली आहे; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

वणी नगरपरिषदेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ता संबंधित हॉल मालकाने गेल्या कित्येक वर्षांपासून बेकायदेशीरपणे व जबरदस्तीने काबीज करून त्यावर अनधिकृत बांधकाम उभारले, असे जाणकारांचे मत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. हॉल व लॉनच्या अगदी समोर शाळा व महाविद्यालये असल्याने या परिसरात विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. हॉलमधील कार्यक्रमांमुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या हॉलमध्ये आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग (Fire Exit) उपलब्ध नाही. अग्निशमन दलाच्या नियमांना पूर्णपणे डावलून हजारो लोकांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे. कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करून प्रचंड आवाजात डी.जे. व साऊंड सिस्टिम वाजवली जाते. याचा नाहक त्रास वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले व अभ्यासू विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच कार्यक्रमांनंतर उरलेला कचरा व अन्न उघड्यावर फेकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 हॉल मालकाचा स्वतःच्या मालकीचा अनधिकृत वॉटर फिल्टर प्लांट असून, त्यातून सतत पाणी रस्त्यावर वाहत राहिल्याने नगरपरिषदेने लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता वारंवार खराब होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियमांची पायमल्ली होत असताना आणि सार्वजनिक जागेवर उघड-उघड अतिक्रमण केलेले असताना, या हॉल आणि लॉनला नगरपरिषदेकडून परवानग्या आणि 'एनओसी' (NOC) कशी काय मिळते? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. नगरपरिषद प्रशासन संबंधित हॉल मालकाला पाठीशी घालत आहे का? असा सवाल उपस्थित करून, याविरोधात न्यायालयात जनहित याचिका (PIL) का दाखल करू नये? असा इशाराही देण्यात आला आहे.  

जर येत्या ८ दिवसांत नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवले नाही आणि हॉलवर कडक कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेत तीव्र जनआंदोलन छेडेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या सर्व परिस्थितीची जबाबदारी पूर्णपणे नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. 

निवेदन देतेवेळी फाल्गुन गोहोकार तालुकाध्यक्ष, राकेश वैद्य शहराध्यक्ष, लकी सोमकुवर, मयूर गेडाम, भोला चिकनकर, रामदास निखाडे, अमोल मसेवार, सुरज काकडे, मनोज उरकुडे, धीरज बगवा, शुभम हुलके यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक व नागरिक उपस्थित होते
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();