टॉप बातम्या

गरजू महिलांसाठी स्माईल फाउंडेशनचा साडीदान उपक्रम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 
 
वणी : नवरात्रोत्सव आणि दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी स्माईल फाउंडेशन, वणी यांच्या वतीने विशेष साडीदान उपक्रम राबविण्यात येत आहे.

सणासुदीच्या काळात प्रत्येक महिलेला सन्मानाने आणि आनंदाने सण साजरा करता यावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक महिलांना सणासाठी नवीन साडी खरेदी करणे शक्य होत नाही. अशा महिलांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांना मायेची, आपुलकीची आणि सन्मानाची भेट देण्याच्या उद्देशाने साडीदान अभियान राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत 14 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साड्या आणि लुगड्यांचे संकलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या कपाटातील वापरात नसलेल्या, मात्र स्वच्छ व सुस्थितीतील साड्या दान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.                                                 

आपण वापरत नसलेली, मात्र स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असलेली एक साडी एखाद्या गरजू महिलेसाठी सणाची आनंददायी भेट ठरू शकते. आपल्या छोट्याशा योगदानातून एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकते आणि तिचा सण अधिक आनंददायी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जास्तीत जास्त साड्या दान कराव्यात, असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
7038204209 / 8570032700

येथे करता येणार साडीदान
साडी संकलनासाठी जाधव निवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, प्रसाद प्रिंटिंगच्या बाजूची गल्ली, गणपती मंदिराजवळ, वणी येथे संकलन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय स्थानिक मंडळांच्या अध्यक्षांकडेही साड्या जमा करता येणार आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();