टॉप बातम्या

जैताई मंदिरात नृत्योत्सवातून देवीभक्तीचा जागर!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : श्री जैताई देवस्थान समितीच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवांतर्गत १२ ऑक्टोबर रोजी सागर झेप बहुद्देशीय संस्था, वणी यांच्या संकल्पनेतून ‘नृत्योत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वणीतील नृत्य कलावंतांनी विविध भक्तिगीतांवर आणि शास्त्रीय नृत्यप्रकारांवर आधारित सादरीकरणे करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकूण ६० कलावंतांनी सहभाग घेतलेल्या या नृत्योत्सवातून देवीभक्तीचा जागर अनुभवायला मिळाला.

वणी येथील नृत्य प्रशिक्षक विकास घाटोळे, चेतन जोशी आणि मंगेश चटारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्यांनी विविध नृत्यप्रकार सादर केले. आकाश बोथले यांनी देवीचा पारंपरिक गोंधळ सादर करून वातावरण भक्तिमय केले. तर कल्याणी जुनघरी हिने महाकालीचे प्रभावी नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तिच्या सादरीकरणातून साक्षात देवी अवतरल्याचा भास निर्माण झाला.

सुमित भालेराव यांनी ‘नटरंग उभा’ या गीतावर नृत्य सादर केले. विकास घाटोळे यांनी कथ्थक, तर निखिल वागळे यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. सचिन कळसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत देवीची पूजा करण्याचा प्रसंग प्रभावीपणे सादर केला. या प्रसंगाला रसिकांनी विशेष दाद दिली.

महिलांनी सादर केलेला देवीचा पारंपरिक गोंधळ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. भक्तिगीतांवरील नृत्ये, पारंपरिक सादरीकरणे आणि शास्त्रीय नृत्यांचा सुरेख संगम यामुळे संपूर्ण कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. एकापेक्षा एक सरस नृत्याविष्कार पाहून रसिकांनी कलावंतांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी कलावंतांसह नृत्य प्रशिक्षक विकास घाटोळे, मंगेश चटारे आणि चेतन जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर श्री जैताई देवस्थानच्या अध्यक्षा भारती सरपटवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव व सामाजिक कार्यकर्ते संजय खाडे, सागर मुने, हरिहर भागवत, मनू महाराज तुगनायत, जयंत लिडबिडे, तुषार नगरवाला आणि विद्यावाचस्पती स्वानंद पुंड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुनील ठाकरे यांनी केले, तर आभार सागर मुने यांनी मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();