सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वरोरा : आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि श्रद्धेचा सन्मान राखत रावण दहनाची प्रथा तात्काळ बंद करण्यात यावी, अशी ठाम मागणी आदिवासी सगा समाज कृती समिती, वरोरा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ना. अशोकजी उईके यांना निवेदन सादर करण्यात आले. शासन व प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि प्रतीकांचा रावण दहनाच्या माध्यमातून अवमान होत असल्याची भूमिका समितीने निवेदनातून मांडली आहे. या प्रथेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात असून, आदिवासींच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचा आदर राखणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. अनेक वर्षांपासून या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
‘आदिवासी समाजाच्या भावनांचा सन्मान राखा’
आदिवासी समाजाने आजवर संयमाची भूमिका घेतली असली, तरी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का पोहोचवणाऱ्या प्रथांविरोधात आता आवाज उठवला जाईल, असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या मागणीवर शासन आणि प्रशासनाने त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा आगामी काळात व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बाळूभाऊ गेडाम तालुका कार्याध्यक्ष, आदिवासी टायगर सेना, वरोरा, चिंतामण आत्राम माजी पंचायत समिती सदस्य, वरोरा, गजानन मेश्राम माजी नगराध्यक्ष, वरोरा, आनंद गेडाम तालुका अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद, वरोरा यांच्यासह विलास परचाके, अजय किन्नाके, सतीश गेडाम, कवीश मेश्राम सर, सुरेश मेश्राम सर आणि सुरज पेंदोर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.