सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : शेतात सोलर कृषी पंप बसविण्यासाठी ४२ हजार ९९४ रुपये भरले, काम पूर्ण करण्याची निर्धारित मुदतही संपली; मात्र पंप अद्याप शेतात बसविण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे, तर पंपाचे अपूर्ण साहित्य रस्त्यावर आणून ठेवल्यानंतर ते चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यालाच स्वतःच्या कष्टाने शेतात हलवावे लागले. चिंचमंडळ येथील शेतकरी दिवाकर नामदेवराव सातपुते यांनी या प्रकाराबाबत मारेगाव येथील महावितरणच्या उपअभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
मुदत संपूनही काम अपूर्ण
सातपुते यांनी तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, त्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलर कृषी पंपासाठी शासनाकडे ४२ हजार ९९४ रुपयांचा भरणा केला. वर्क ऑर्डरनुसार २२ जुलै २०२६ पर्यंत शेतात पंप बसविणे आवश्यक होते. मात्र, १९ ऑक्टोबरपर्यंतही पंप बसविण्यात आला नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
साहित्याची जबाबदारीही शेतकऱ्यावर?
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी सोलर कृषी पंपाचे अपूर्ण साहित्य रस्त्यावर आणून ठेवण्यात आले. साहित्य चोरीला जाऊ नये म्हणून ते स्वतः उचलून शेतात ठेवावे लागले. त्यानंतरही काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कंपनीतील अधिकारी फोन उचलण्यास तयार नसल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
शेतकऱ्याने पैसे भरल्यानंतरही काम पूर्ण होत नसेल आणि साहित्याच्या सुरक्षिततेसाठी त्यालाच धावपळ करावी लागत असेल, तर या प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न या तक्रारीतून उपस्थित झाला आहे.
पंपाअभावी पिके सुकल्याचा आरोप
वेळेत सोलर पंप बसविला असता तर पिके सुकली नसती, असे सातपुते यांनी तक्रारीत म्हटले आहे. पंप बसविण्यास झालेल्या विलंबामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा त्यांचा आरोप असून, या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आज पंप बसविण्यासाठी एवढा त्रास सहन करावा लागत असेल, तर भविष्यात पंप बंद पडल्यास आणखी अडचणी निर्माण होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. पंपाचा प्रत्यक्ष उपयोग होण्याऐवजी तो केवळ शोभेची वस्तू ठरू नये, अशी चिंता त्यांनी अर्जातून मांडली आहे.
दुसरी कंपनी निवडण्याची मुभा देण्याची मागणी
संबंधित कंपनीने स्वतः खड्डे खोदून पंप बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. कंपनी काम करण्यास तयार नसेल, तर दुसरी कंपनी निवडण्याची मुभा द्यावी. तसेच पंपासाठी येणाऱ्या सर्व साहित्याची तांत्रिक तपासणी करून कृषी पंपाचा प्रत्यक्ष वापर करता येईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे.
शेतकऱ्याला विनाकारण त्रास होऊ नये आणि भरलेल्या पैशांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी शासन व संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
आता या तक्रारीवर महावितरण व संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते, तसेच सोलर पंपाचे काम कधी पूर्ण होते, याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.


