चंद्रपूर जिल्ह्यातील महामार्गांवरील वळणांना ‘रिफ्लेक्टर’चे सुरक्षा कवच!

राष्ट्रीय व राज्यमार्गांवर रबर वॉल गार्ड रिफ्लेक्टर टेप लावताना पोलीस कर्मचारी 

सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील विविध महामार्गांवरील धोकादायक वळणांवर असलेल्या झाडांना रबर वॉल गार्ड रिफ्लेक्टर टेप लावण्यात आली आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील वळणांचा अंदाज न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्ते जंगल परिसरातून जातात. या मार्गांवर एकपदरी व दुपदरी, तसेच अरुंद व नागमोडी वळणांचे रस्ते आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रकाशात वळणांचा स्पष्ट अंदाज न आल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः वळणांवरील झाडे आणि रस्त्याची रचना लक्षात न आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातांमध्ये अनेकदा जीवितहानीही होते.

ही बाब लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर यांच्याकडून जिल्ह्यातील सहा प्रमुख मार्गांवरील वळणांजवळ असलेल्या झाडांवर रिफ्लेक्टर टेप लावण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर ते मूल, मूल ते सावली, खेडी फाटा ते गोंडपिपरी, बल्लारपूर ते गोंडपिपरी, मूल ते सिंदेवाही आणि नागभीड ते कानपा या मार्गांचा समावेश आहे.

रिफ्लेक्टर टेपमुळे वाहनांच्या प्रकाशात वळणांवरील झाडे अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे आणि वेळेत वाहनाचा वेग नियंत्रित करणे शक्य होईल. अपघातप्रवण ठिकाणी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्यास रस्ते सुरक्षेला निश्चितच हातभार लागू शकतो.

वाहनचालकांनीही नियमांचे पालन करावे!
केवळ रिफ्लेक्टर लावून अपघात टाळता येणार नाहीत, तर वाहनचालकांची सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. महामार्गावरील वळणांवर वाहनांचा वेग कमी ठेवावा, वाहने सावकाश व काळजीपूर्वक चालवावीत आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अमोल बारापात्रे, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर यांनी केले आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();