सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील वार्ड क्रमांक 2, जुना हनुमान मंदिराजवळ ह भ प पांडुरंग महाराज ठक व वार्डवासीयांनी दिनांक 11ऑकटोबर ते 18 ऑकटोबर पर्यंत आयोजित केलेल्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा सप्ताह व विविध देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता रविवार, दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
या सप्ताहात भागवत प्रवक्त्या ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर (भद्रावतीकर) यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद्भभागवत कथेचे रसाळ निरूपण करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीला, भक्त प्रल्हादाची भक्ती, नरसिंह अवतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोवर्धन पर्वत उचलण्याच्या प्रसंगांच्या आकर्षक झाकींमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले.
या धार्मिक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या सामुदायिक प्रार्थनेचा मारेगाव येथे वार्ड क्रमांक 2 मध्ये शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक व सामाजिक एकोप्याचे वातावरण निर्माण झाले.
या सामुदायिक प्रार्थनेसाठी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने गुरुदेव उपासक व उपासिका उपस्थित होत्या. विशेषतः मारेगाव, वणी, वरोरा आणि भद्रावती तालुक्यांसह विविध ठिकाणांहून आलेल्या गुरुदेव भक्तांनी सामुदायिक प्रार्थनेत सहभागी होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अभिवादन केले. यावेळी स्थानिक वार्डातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून मानवता, बंधुभाव, एकता, सामूहिक उपासना आणि ग्रामविकासाचा संदेश देण्यात आला. मारेगाव येथे वार्ड क्रमांक २मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा आध्यात्मिक व समाजप्रबोधनात्मक उपक्रमांना चालना मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
रविवार, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांचे गोपाल काल्याचे कीर्तन पार पडले. आपल्या कीर्तनातून त्यांनी भक्ती, प्रेम, समता, सदाचार आणि सामाजिक एकोप्याचे महत्त्व विशद केले. कीर्तनाला उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात व जयघोषात प्रतिसाद दिला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहादरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. तसेच विठ्ठल-रुख्माई, नंदी शिवपिंड, दुर्गामाता, कासव व पादुका मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
या संपूर्ण सोहळ्यात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील गुरुदेव उपासक-उपासिका, स्थानिक वार्डवासी, भाविक आणि धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
श्रीमद्भागवत कथा सप्ताह, प्राणप्रतिष्ठा सोहळा, गोपाल काल्याचे कीर्तन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनेची वार्ड क्र.२मध्ये प्रथमच झालेला शुभारंभ यांमुळे मारेगाव येथे भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.


