सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : वणी एमआयडीसी परिसरात परराज्यातून आणलेल्या सुमारे १५ हजार अवैध दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याने तालुक्यातील अवैध दारू व्यवसायाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कारवाईत सुमारे १२ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात परराज्यातील दारूसाठा वणीपर्यंत पोहोचतोच कसा, असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी लढा संघटनेचे वणी विधानसभा प्रमुख प्रवीण खानझोडे यांनी केली आहे.
१३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास वणी एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, हा दारूसाठा मध्य प्रदेशातून आणण्यात आला होता. स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत असतानाही अमरावती विभागातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वणीत येऊन कारवाई करावी लागते, ही बाब गंभीर असल्याचे खानझोडे यांनी म्हटले आहे. यावरून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत असून, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
वणी परिसरात परराज्यातील दारूचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करीत, या व्यवसायाला संबंधित विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे अभय आहे का, याचा तपास करण्यात यावा, असे खानझोडे यांनी सांगितले. या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण किंवा लाचखोरी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा संशय व्यक्त करीत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात लढा संघटना, वणी विधानसभा यांच्या वतीने प्रवीण खानझोडे यांनी उपविभागीय अधिकारी, वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, यवतमाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, मुंबई आणि अधीक्षक, यवतमाळ यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करावी, आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयाची एसीबीमार्फत स्वतंत्र तपासणी करावी, तसेच वणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यासोबतच वणी तालुक्यातील सर्व दारू दुकाने, बिअर बार आणि गोदामांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन
या निवेदनावर आठ दिवसांत समाधानकारक कारवाई करण्यात आली नाही, तर वणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रवीण खानझोडे यांनी दिला आहे. अवैध दारू व्यवसायाला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, संबंधित प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लढा संघटनेने केली आहे.


