टॉप बातम्या

कुंभा येथील बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह अखेर नाल्यात आढळला!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील कुंभा येथून बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह गदाजी बोरी गावालगत असलेल्या नाल्यात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चिकू उर्फ चेतन मनोज चांदेकर (वय ५ वर्षे, रा. कुंभा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने कुंभा गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन हा २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा दिसेनासा झाल्यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी रात्रभर गाव परिसर तसेच शेतशिवारात त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता. याबाबत पोलिसात वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मारेगाव पोलिसांनीही शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान, गुरुवारी तालुक्यातील गदाजी बोरी गावालगत असलेल्या नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला.

पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. चेतनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो नाल्यापर्यंत कसा पोहोचला आणि या घटनेमागे नेमके काय कारण आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणातील वस्तुस्थिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास करून मृत्यूमागील नेमके गूढ उकलण्याचे आव्हान मारेगाव पोलिसांसमोर आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();