टॉप बातम्या

गुप्तधनाच्या शोधाचा डाव फसला; सातही आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात मानकी गावालगत असलेल्या खेकडी (रिठ) येथील हनुमान मंदिर परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी पूजा-पाठ करून खड्डा खोदण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर घटनास्थळावरून पसार झालेल्या अन्य पाच जणांना वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच ताब्यात घेतले. या प्रकरणी सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास पाच पुरुष आणि दोन महिला मंदिर परिसरात पूजा-पाठ करून टिकास व फावड्याच्या साहाय्याने खड्डा खोदत असल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. त्यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर सुमारे १०० ते १५० ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांची गर्दी पाहून पाच जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, वणी येथील अनिल मारोती बावणे (५६) आणि मानकी येथील रामदास निळकंठ दवें (४४) यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनास्थळावरून पसार झालेल्यांमध्ये विठ्ठल अतकरे (३०), गणेश नागपुरे (२८) आणि वासुदेव (वय अंदाजे ५०, पूर्ण नाव माहीत नाही, तिघेही रा. घुग्घुस), रंजना कामटकर (३५, रा. मैल गड्डा, शास्त्रीनगर, वणी) तसेच अंदाजे ३५ वर्षांच्या एका अनोळखी महिलेचा समावेश होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवत या पाचही जणांनाही काही तासांत ताब्यात घेतले.

पूजेचे साहित्य आणि खोदकामाची साधने जप्त

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी वणी पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक सय्यद साजिद यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई केली. यावेळी पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य, पाच लाडू, पाच चिकन सुपाऱ्या, टिकास आणि फावडे जप्त करण्यात आले.
या प्रकरणी सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();