सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
चंद्रपूर : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांच्या भरोसा सेलतर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ‘बालविवाहाला नकार द्या, बालपण जगू द्या’ हा संदेश देत नागरिकांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि बालविवाह रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.
मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असताना केला जाणारा विवाह हा बालविवाहाच्या श्रेणीत येतो. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण अपूर्ण राहण्याची शक्यता असते. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन कमी वयात गर्भधारणा झाल्यास गंभीर आरोग्यविषयक धोके उद्भवू शकतात. बालविवाहामुळे मुलांच्या स्वावलंबनाच्या आणि स्वतःच्या भविष्याविषयी निर्णय घेण्याच्या संधीही मर्यादित होतात.
बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी विविध कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार बालविवाह घडवून आणणाऱ्या किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे पालक, नातेवाईक आणि समाजातील नागरिकांनी बालविवाहाला प्रोत्साहन न देता मुलांच्या शिक्षणाला आणि उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन या अभियानातून करण्यात येत आहे.
बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा १०९८ या बाल हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच संबंधित बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, महिला व बालविकास विभाग यांनाही माहिती देता येते. बालकांची ओळख आणि गोपनीयता जपून अशा घटनांची माहिती देणे महत्त्वाचे आहे.
‘मुलींचे शिक्षण, मुलांचे उज्ज्वल भविष्य आणि बालविवाहमुक्त समाज’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून चंद्रपूर पोलिसांच्या भरोसा सेलतर्फे करण्यात आले आहे.


