सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : पारंपरिक कृषी संस्कृतीचे जतन आणि शेतकरी बांधवांच्या श्रमाला सलाम करण्याच्या उद्देशाने पोळा उत्सव समितीच्या वतीने शासकीय मैदानावर पोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम राहिला. विविध रंगांची सजावट, गोंडे, झुली आणि आकर्षक साहित्याने नटलेल्या बैलजोड्या मैदानात दाखल झाल्याने उत्सवाला विशेष रंगत आली.
बैलजोडी सजावट स्पर्धेमुळे कार्यक्रमाचे आकर्षण आणखी वाढले. उत्कृष्ट सजावटीसाठी निवड झालेल्या विजेत्यांना शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरेडिया यांच्या हस्ते अनुक्रमे ३१००, २१०० आणि ११०० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धेपुरता सन्मान न करता उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा पोळ्याच्या निमित्ताने गोड पदार्थ व लाडू देत तसेच गळ्यात दुपट्टा टाकून सन्मान करण्यात आला.
यावेळी बैलजोडीचे विधिवत पूजन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, माजी पोलीस पाटील नितीन शिरभाते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या कष्टांचे कौतुक करत पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन पोळा उत्सव समितीचे सागर मुने यांनी केले. अमित उपाध्ये यांनी आयोजनाची व्यवस्था पाहिली, तर आभार अॅड. प्रवीण पाठक यांनी मानले.

