सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सध्या सहकार क्षेत्रातील निवडणुकीमुळे चांगलीच रंगत निर्माण झाली असून, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती गौरकार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्हा गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपची दमदार एन्ट्री केली आहे. गौरकार यांच्या उमेदवारीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजप मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात गौरकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय खीरटकर, चंद्रशेखर काळे, सुखराज दुधकोहळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भाजपने सहकार क्षेत्रातही आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याचे चित्र दिसून आले.
मारोती गौरकार यांचा मारेगाव तालुक्यातील सामाजिक व राजकीय संपर्क, ओबीसी समाजातील संघटनात्मक काम आणि भाजपमधील सक्रिय भूमिका यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची राजकीय लढत म्हणून पाहिले जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असलेल्या सहकार क्षेत्रात भाजपने पाऊल टाकल्याने आगामी काळात या निवडणुकीचे पडसाद तालुक्यातील राजकीय वातावरणावरही उमटण्याची शक्यता आहे.
गौरकारांच्या उमेदवारीने मारेगावातून भाजपने सहकाराच्या मैदानात जोरदार शड्डू ठोकला असून, आता या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.