सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध खाद्यविक्री आस्थापनांची तपासणी करत अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणुकीची पद्धत, स्वच्छता, विक्रीसाठी आवश्यक परवाने तसेच संबंधित कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी एका स्वीट बेकरीसह किराणा मॉलमध्ये संशयास्पद वाटलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
राज्यात सध्या भेसळयुक्त, निकृष्ट तसेच नियमबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मारेगावातही ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तपासणीदरम्यान घेण्यात आलेले नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, त्यातून अन्नपदार्थांची गुणवत्ता व नियमांचे पालन याबाबतचे वास्तव समोर येणार आहे.
अन्न प्रशासन अधिकारी डॉ. सचिन नरवडे यांनी सांगितले की, संशयित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधितांविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
दरम्यान, प्रशासनाचे पथक मारेगाव शहरात दाखल झाल्याची माहिती काही वेळातच सर्वत्र पोहोचली. तपासणीची चाहूल लागताच काही पानटपरी चालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने तातडीने बंद केली. त्यामुळे कारवाईची चर्चा शहरभर रंगली होती.
वृत्त लिहीपर्यंत प्रशासनाच्या पथकाकडून नमुने घेण्यासह आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया सुरू होती. संबंधित अन्ननमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यांचा अहवाल काय येतो आणि त्यानंतर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता मारेगावकरांचे लक्ष लागले आहे.



