सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील नांदेपेरा मार्गे देवी फाटा ते मच्छिन्द्रा-मार्डी या राज्य मार्गाची सध्या अक्षरशः दुरवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वनोजा (देवी) रोडवरील पंचमुखी हनुमान देवस्थानाजवळील रस्त्यावरील खड्ड्यामुळे २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी दुचाकी उसळून अपघात झाला. या दुर्घटनेत वनोजा येथील पुनवटकर नामक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्यांच्यावर चंद्रपूर नंतर आता नागपूर येथे उपचार सुरू असल्याचे समजते.
खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत
मागील काही महिन्यांपासून या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्याची डागडुजी करण्यात येत असली तरी ती केवळ थातूरमातूर स्वरूपाची असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. केलेली दुरुस्ती काही दिवसांतच पुन्हा उखडत असल्याने सार्वजनिक निधीचा नेमका उपयोग कितपत होत आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
आंदोलने झाली, मात्र रस्ता जैसे थे!
वणीवरून वडकीकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असून, या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे राज्य मार्गाची अशी दुरवस्था असणे ही गंभीर बाब आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी नागरिकांनी आंदोलने आणि विविध माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले; मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता प्रवासी आणि परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
