टॉप बातम्या

वर्धानदी पात्रात महसूल विभागाची धाड; अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : सणासुदीच्या काळात प्रशासनाचे लक्ष दुसरीकडे असल्याचा गैरफायदा घेत अवैध रेती उपसा करणाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले असतानाच मारेगाव महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करीत दोन ट्रॅक्टर जप्त केले. कोसारा परिसरातील वर्धानदी पात्रात ही कारवाई करण्यात आली.

दि. २८ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता वर्धानदी पात्रात अवैधरीत्या रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी तत्काळ महसूल पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने घटनास्थळी धडक दिली असता नदीपात्रात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती उपसण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले.

महसूल पथकाची चाहूल लागताच रेती उपसा करणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, पथकाने दोन्ही ट्रॅक्टर जागीच ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कारवाईसाठी मारेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी यतीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. कारवाईत तलाठी कुडमेथे, तलाठी चिकनकर तसेच शिपाई वेले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महसूल विभागाच्या या पहाटेच्या कारवाईमुळे मारेगाव तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();