सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील गौराळा ग्रामपंचायत हद्दीतील चापली हनुमान मंदिराजवळ असलेल्या पानटपरीच्या माध्यमातून अवैधरित्या दारूविक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अवैध दारूविक्रीमुळे गावातील नागरिकांसह लहान मुलांवरही व्यसनाचे दुष्परिणाम होत असून, कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्यासोबतच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी मारेगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना २४ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देऊन संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर तातडीने कायदेशीर कारवाई करून दारूबंदी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, चापली हनुमान मंदिराजवळील पानटपरीच्या माध्यमातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिर परिसरातही या प्रकाराचा परिणाम होत आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, निवेदनावर सात दिवसांत पूर्णपणे अंमलबजावणी करून कारवाई करण्यात यावी; अन्यथा पोलिस प्रशासनाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर सरपंच सौ.मयुरी चंद्रकांत धोबे,उपसरपंच
अतुल गायकवाड, अनिता दीपक कोयचाडे, सदस्य
सुरेखा योगीराज कोडापे सदस्य, शारदा बंडू येरकाडे सदस्य, जुली किशोर राऊत, अर्चना संतोष मडकाम,
सताबाई दामोदर येटे, उज्वला विलास मेश्राम
योगिता गुलाब कनाके, मनिषा अनिल कंगाले, सुनीता दीपक टेकाम, सीमा मडकाम, सविता कोडापे,
कविता कोडापे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनाही माहितीस्तव व पुढील योग्य कारवाईसाठी देण्यात आली असून पोलिस प्रशासन या तक्रारीवर कोणती कारवाई करते, याकडे गौराळा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

