सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने अमरावती महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त मारेगाव शहरात आज, रविवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बदकी भवन, धोन्सा रोड, मारेगाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांना आणि भक्तीपरंपरेला उजाळा मिळणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात अभंगवाणीची सुरेल मैफल रंगणार असून, विविध नामवंत कलाकारांच्या भक्तिगीतांनी उपस्थितांना भक्तिरसाचा अनुभव घेता येणार आहे. तबला, पखवाज, हार्मोनियम आणि टाळ यांच्या साथीने सादर होणाऱ्या अभंग-भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांची भेट, संत ज्ञानदेव समाधी सोहळा, तसेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि ज्ञानेश्वरी लेखन यांसारख्या प्रसंगांवर आधारित नाट्यप्रवेश. यासोबतच संत जगन्नाथ महाराज भजन मंडळ, केगाव यांच्याकडून नाट्यप्रवेश व वारी नृत्य सादर करण्यात येणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्ती, ज्ञान आणि अध्यात्मिक विचारांचा जागर करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला मारेगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आज सायंकाळी ६ वाजता मारेगाव भक्तिरसात रंगणार असून, सुरेल स्वरांची ही मैफल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

