सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
मारेगाव : सध्या तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट असून शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या उद्देशाने भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतीभाऊ गौरकार यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
आज सकाळी ८ वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश लांबट होते. यावेळी अभ्यासिकेचे संचालक राजेश भाऊ, अॅड. ग्रामगीताचार्य अतुल खापणे, आकाश बदकी, राजू जांभुळकर, गौरव गौरकार, मंगेश अंड्रसकर यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्दीची कमतरता नाही; मात्र अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके व शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यात अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा आनंद साजरा करणारा नसून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देणारा ठरला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाऐवजी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.