सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : संभाव्य एल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या दृष्टीने मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील धामणी येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटवून देताना पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. कमी खर्चात आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून वनराई बंधारे उभारता येत असल्याने नागरिकांनीही या जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
'पाणी अडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

