सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, त्यांचे साहित्य आणि ग्रामगीतेतील जीवनमूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ग्रामगीता जीवन विकास परीक्षा व्यापक स्वरूपात राबविण्याच्या संदर्भात मारेगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी हनुमान मंदिर, मार्डी रोड, मारेगाव येथे दुपारी ठीक १.०० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. सुनील देऊळकर, तालुका सेवाधिकारी, मारेगाव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका प्रचार प्रमुख श्री. राजूभाऊ सिडाम उपस्थित होते.
बैठकीमध्ये मारेगाव तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व ग्राम शाखा, भजन मंडळे, महिला बचत गट तसेच पुरुष बचत गट यांच्यामध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षा प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परीक्षेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आणि ग्रामगीतेतील जीवनदृष्टी समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. सुनील देऊळकर म्हणाले की, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविणे आणि सुसंस्कृत समाज तसेच संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही केवळ परीक्षा नसून विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार अभियान आहे.”
या बैठकीचे सूत्रसंचालन श्री. किसनभाऊ मत्ते, सचिव, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग, मारेगाव यांनी केले.
शिक्षक संघाची कार्यकारिणी गठित:
बैठकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा शिक्षक संघ, मारेगाव तालुका यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली. शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी श्री. शंकररावजी मडावी सर तर सचिवपदी श्री. गिरीधरजी राऊत सर यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांमध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षा अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्यांची रुजवणूक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती:
या बैठकीस अनिल नावडे, जिल्हा कार्यकारी सदस्य; बंडू कुडमेथे, परीक्षा संघटक; कैलास बोंडे, उपतालुका सेवाधिकारी; बंडू सुर, तालुका संघटक; गजेंद्र पालकर, मध्यवर्ती प्रतिनिधी; मारोती राजूरकर, उपतालुकाप्रमुख परीक्षा विभाग; सुरज येवले, तालुका प्रसिद्धीप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कार्यकारिणी सदस्य प्रकाश उईके, चंद्रभान दर्वेकर, रामपाल रामपुरे तसेच गुरुदेव उपासक मोहन किनेकर, दिगंबर कुमरे, रमेशभाऊ मिलमिले,शिवदास मेश्राम, तुळशीदास लांडे आणि साहेबराव सायंकार यांचीही उपस्थिती लाभली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवणूक आणि समाजामध्ये नैतिक व विधायक जीवनमूल्यांची जडणघडण करण्यासाठी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा हे प्रभावी माध्यम असून, ती मारेगाव तालुक्यात व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीस उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.