सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना वणी नगर परिषदेने याविरोधात धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे. शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या मागणीची तातडीने दखल घेत नगर परिषदेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत तब्बल ३० मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात दाखल केली.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला. चौकाचौकात तसेच प्रमुख मार्गांवर जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीतील या सूचनेची नगर परिषदेने गांभीर्याने दखल घेत तत्काळ कारवाईला सुरुवात केली. बैठकीनंतर अवघ्या तीन तासांत नगर परिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत मोहीम राबवून ३० मोकाट जनावरे ताब्यात घेतली आणि त्यांना कोंडवाड्यात दाखल केले.
नगर परिषदेच्या या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आगामी सण-उत्सवांच्या काळातही मोकाट जनावरांविरोधातील मोहीम सातत्याने राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील रस्ते व चौक मोकाट जनावरांपासून मुक्त करण्यासाठी प्रशासनाने नियमित मोहीम राबविण्याची गरज आहे.