सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : शिक्षक भरतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपल्यानंतर वणी येथील स्वामी विवेकानंद अभ्यासगटात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सात उमेदवारांनी शिक्षकपदाला गवसणी घातली आहे. जिल्हा परिषदांच्या विविध शाळांमध्ये झालेल्या या निवडीमुळे अभ्यासगटासह उमेदवारांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डी.एड., बी.एड. तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या अनेक उमेदवारांना गेल्या काही वर्षांपासून भरती प्रक्रियेची प्रतीक्षा होती. भरती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांसमोर अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, यावर्षी राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करून मोठ्या प्रमाणावर पदे भरण्याचा मार्ग मोकळा केला.
या प्रक्रियेत उमेदवारांनी पात्रतेनुसार विविध जिल्ह्यांना प्राधान्यक्रम देत अर्ज केले. गुरुवारी जाहीर झालेल्या निवड यादीत वणीच्या स्वामी विवेकानंद अभ्यासगटातील सात उमेदवारांची शिक्षकपदी निवड झाली.
यामध्ये शंकर घुगरे यांची जिल्हा परिषद गडचिरोली, दीपाली पचारे, आशिष ताजने आणि हिमानी भोयर यांची जिल्हा परिषद चंद्रपूर, रोशन भोयर आणि सपना ढवस यांची जिल्हा परिषद यवतमाळ, तर अजित मेश्राम यांची जिल्हा परिषद बुलढाणा येथे शिक्षकपदी निवड झाली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सातत्य, संयम आणि कठोर परिश्रमाची साथ सोडली नाही. तब्बल चार वर्षांच्या प्रयत्नानंतर मिळालेल्या या यशाने मेहनतीचे चीज झाल्याची भावना निवड झालेल्या उमेदवारांनी व्यक्त केली.



