टॉप बातम्या

वनोजा–देवी ते हिवरा रस्ता मोजतोय अखेरच्या घटका; नागरिकांचा संताप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, वनोजा–देवी ते हिवरा मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्ता आता अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि खडबडीत रस्त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावरून वणी–मारेगाव प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध तसेच रुग्णांना या रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

रस्त्याची दुरवस्था इतकी वाढली आहे की, स्थानिक नागरिकांनी मारेगाव–वणी प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या तालुक्यातील रस्ता वापरण्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यात वळसा घालून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येणे, ही संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुसती पाहणी आणि आश्वासन नको, तर प्रत्यक्ष रस्त्याचे काम कधी सुरू होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मारेगाव तालुक्यातील या महत्त्वाच्या मार्गाकडे सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पुढारी आता तरी गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्ता पूर्णपणे उध्वस्त होऊन मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();