सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
भालर व उकणी परिसरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वणी येथे येतात. मात्र नियमित सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. काही विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालय किंवा शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून सातत्याने होत होती.
ही गरज लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय भाऊ खाडे यांनी बससेवेचा प्रश्न संबंधित यंत्रणेकडे सातत्याने मांडत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर वणी भालर उकणी मार्गावर बस धावू लागली आहे.
बससेवा सुरू झाल्यानंतर संजय खाडे यांनी बसचालक व वाहकांचे शाल व पेढे देऊन स्वागत केले. सार्वजनिक वाहतूक ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असून, बससेवेचा नियमित लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे सोपे होणार असून, त्यांच्या प्रवासाचा खर्च आणि दैनंदिन धावपळही कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नोकरी, व्यवसाय, बाजारपेठ तसेच विविध शासकीय कामांसाठी वणीला येणाऱ्या नागरिकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील अडचण लक्षात घेऊन बससेवेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने भालर उकणी परिसरातून संजय खाडे यांचे कौतुक होत आहे. ही बससेवा नियमितपणे सुरू राहावी, तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आवश्यक त्या फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.