टॉप बातम्या

धारदार कातीने तरुणावर जीवघेणा हल्ला; शास्त्रीनगर परिसरात खळबळ

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : शहरातील शास्त्रीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी रात्री घडली. या हल्ल्यात संतोष पुंडलिक कोरवते हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबरच्या रात्री दीपक चौपाटी परिसरातील सलीम चिकन सेंटर येथे संतोष कोरवते उपस्थित होता. यावेळी त्याचे परिचित आसिफ शेख व राहुल मत्ते हे एका वृद्ध व्यक्तीची थट्टा-मस्करी करून त्याला त्रास देत असल्याचे संतोषच्या निदर्शनास आले. त्याने दोघांना वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नका, असे सांगितल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. शिवीगाळही झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाद वाढू नये म्हणून संतोष तेथून निघून गेला.

यानंतर रात्री सुमारे ११.१५ वाजता संतोष मोटारसायकलने घरी जात असताना के.जी.एन. अँक्वासमोर झेंडा चौक परिसरात त्याला अडविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी आसिफ शेख याच्यासह जिगर आसु शेख, राहुल मारोती मत्ते आणि अच्छु शब्बीर शाह हे तेथे उपस्थित होते.

तक्रारीनुसार, आसिफ शेख याने काही वेळापूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला. त्यानंतर संतोषच्या पोटाच्या डाव्या बाजूस तसेच कमरेवर धारदार कातीने वार करण्यात आले. संतोषने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता जिगर शेख याने त्याला मोटारसायकलवरून खाली ओढून हातबुक्क्यांनी मारहाण केली. राहुल मत्ते आणि अच्छु शब्बीर शाह यांनीही मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झालेल्या संतोषला त्याचा भाऊ महादेव पुंडलिक कोरवते याने तातडीने सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

या प्रकरणी महादेव पुंडलिक कोरवते यांनी वणी पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, तसेच हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा तपास वणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखडे करीत आहेत.
खादी कॉटन महासेल 👇👇🌀 https://youtu.be/Gz8wxCSaZN8?si=vVNGVqg34c26_dj7


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();