टॉप बातम्या

वनोजादेवीतील गरजू महिलांना घरकुलाचा लाभ मिळावा; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील मौजा वनोजादेवी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीत पात्र असूनही काही गरजू कुटुंबांना वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गावातील गरजू कुटुंबातील महिलांनी मारेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्यक्रमानुसार गावातील कच्च्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. डिमन गोवर्धन टोंगे यांनी जाणीवपूर्वक राजकीय द्वेषातून काही कुटुंबांची नावे घरकुल लाभार्थी यादीतून वगळून त्यांच्या नातेवाईकांसह राजकीय हितसंबंध असलेल्या व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या कथित गैरप्रकाराची सखोल व न्यायपूर्ण चौकशी करून पात्र व गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यास विलंब झाल्यास किंवा न्याय न मिळाल्यास आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याची जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन १५ सप्टेंबर २०२६ रोजी मारेगाव येथे गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदनावर वनोजादेवी येथील संबंधित महिलांच्या स्वाक्षऱ्या असून, त्याची प्रत जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही देण्यात आली आहे.

दरम्यान, निवेदनातील आरोपांची प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचा घरकुल लाभ प्रत्यक्षात मिळतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();