सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानडा येथे ग्रामपंचायत कानडा यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
समाजात महिलांना योग्य संधी, सन्मान व समान वागणूक मिळावी तसेच विविध क्षेत्रांमध्ये महिलांबद्दल असलेले गैरसमज व दुय्यम वागणूक दूर व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कानडा यांच्या सरपंच सौ. सुषमा रूपेश ढोके होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स तसेच गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुवर्णाताई पिंपळकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात ग्रामपंचायत महिला सदस्या रेखा आस्कर, कविता झीले आणि कलावती बोथले यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा आस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर फूलभोगे यांनी मानले.
या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासोबतच महिलांच्या सन्मानाबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला.