सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जात असला, तरी पंचायत स्तरावर सुरू असलेल्या अनेक कामांमध्ये ‘टक्केवारी’ची पद्धत रुजल्याची चर्चा गावागावांत रंगू लागली आहे. त्यामुळे विकासकामांची गती मंदावल्याचे चित्र दिसत असून, “टक्केवारीत अडकला गावघड्याचा विकास” अशी ओरड ग्रामस्थांतून ऐकू येत आहे.
गावपातळीवर रस्ते, नाली, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकामे यांसारख्या अनेक मूलभूत कामांसाठी निधी येत असतो. मात्र, काही ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वीच टक्केवारीच्या चर्चेमुळे कामे अडकतात किंवा दर्जाहीन होतात, अशी तक्रार नागरिक करत आहेत. परिणामी शासनाच्या योजनांचा खरा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असेल तर गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. परंतु टक्केवारीच्या प्रथेमुळे निधीचा योग्य वापर होत नसल्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रथेला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी टक्केवारीची संस्कृती पूर्णपणे हद्दपार होणे आवश्यक असल्याचे मतही सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. गावाच्या विकासासाठी आलेला प्रत्येक रुपया हा गावाच्या हितासाठीच खर्च व्हावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
याबाबत वरिष्ठ स्तरावरून लक्ष घातले तर पंचायत स्तरावरील कामांमध्ये पारदर्शकता आणल्यास गावघड्याचा विकास अधिक वेगाने आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकतो. टक्केवारीच्या विळख्यातून विकासकामे मुक्त होऊन गावाचा सर्वांगीण विकास घडावा, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.