सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील गणेशपूर परिसरातील मंगलमुर्ती पार्क येथील घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी रामरतन सिताराम हरडे (वय 59, रा. मंगलमुर्ती पार्क, गणेशपूर, वणी) हे 21 एप्रिल रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून नोकरीवर गेले होते. दरम्यान 21 एप्रिल दुपारी 4 ते 22 एप्रिल दुपारी 3 या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील दोन सोन्याच्या बांगळ्या (40 ग्रॅम), एक सोन्याचा गोफ (20 ग्रॅम), दोन सोन्याच्या अंगठ्या (10 ग्रॅम) तसेच कानातील सोन्याचे लटकन (6 ग्रॅम) असा एकूण 76 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.
ही घटना लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिली असून, त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331 (3), 331 (4) व 305 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद हे करीत आहेत.