सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : दोन रुपयांच्या झेरॉक्ससाठी बँकेबाहेर पडणे एका तरुणाला महागात पडले. गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलांनी ब्लेडने बॅग कापून ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. मारेगाव येथील सेंट्रल बँक शाखेत भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, राहुल किसन भरडे (वय २८, रा. डोमा, जि. चंद्रपूर) हे खापरी येथील सबस्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. धान विक्रीतून मिळालेले १ लाख रुपये त्यांच्या मित्र पियुष वैद्य यांच्या खात्यावर जमा झाले होते. २० एप्रिल रोजी दोघेही रक्कम काढण्यासाठी मारेगाव येथील सेंट्रल बँकेत आले.
सुरुवातीला ५० हजार रुपये काढून राहुल यांनी ते बॅगमध्ये ठेवले. उर्वरित ५० हजार काढण्यासाठी पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक असल्याने झेरॉक्स काढण्यासाठी ते मित्रासोबत बँकेबाहेर गेले. दरम्यान, बॅग बाकावरच ठेवण्यात आली. काही वेळाने परत आल्यानंतर बॅगच्या आतील बाजूस चिरा मारलेली दिसली आणि ५० हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले.
घटनेच्या दिवशी ड्युटीवर जाण्याची घाई असल्याने राहुल तक्रार देऊ शकले नाहीत. मात्र २२ एप्रिल रोजी त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून हेड कॉन्स्टेबल शंकर बारेकर पुढील तपास करीत आहेत.
सीसीटीव्हीत संशयित महिला कैदचोरीचा संशय आल्याने राहुल यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिला त्यांच्या मागोमाग फिरताना दिसल्या. या महिलांनीच संधी साधून बॅग ब्लेडने कापून पैसे चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे बँक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कामासाठी बॅग बेवारस सोडल्याने मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले. पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.